नास्तिकांचा पवित्र ग्रंथ श्रीधर तिळवे नाईक
निंदा करू नका
आणि चुकीची निंदा तर अजिबात करू नका
कोणी तुमची निंदा करत असेल
तर तिच्यात तथ्थ आहे का ते पहा
आणि तथ्थ असेल तर स्वतःला सुधारा
आणि तथ्थ नसेल
तर निंदकाला वस्तुस्थिती समजवा
तरीही त्याला निंदाच पसंत असेल
तर तुमचा मार्ग त्याला भिडणार नाही
ह्याची काळजी घ्या
१६३)
वाईट टोपण नावांनी बोलवू नका
शिव्या अजिबात देऊ नका
चिडवू नका चेष्टा करू नका
नसलेले सद्गुण वा दोष चिकटवू नका
उगाचच कुणाच्या परिस्थितीला हसू नका
मदत करा
आणि मदत करता येत नसेल तर
किमान जे मदत करतायत त्यांना
किंवा जी मदत होतीये तिला
थांबवू नका
१६४)
कुणाची गुपिते शोधू नको
माहीत झाली तर फोडू नको
कुणावरही पाळत ठेऊ नको
कुणाची हेरगिरी करू नको
आणि कुणाचीही पाठीमागे निंदा करू नको
गुप्ततेत मजा येते
पण अंतिमतः ही मजा सजा बनते
१६५)
जे नेहमी वाकडेच बोलतात
आणि जे सदोदित दोष काढतात
जे पैश्याने माणसाला मोजतात
आणि जे झोपेतही
सर्वत्र पैसे मोजतात /योजतात
आणि माणसांना पैसे मिळवण्याचे साधन समजतात
ते स्वतःसाठी दुःख तयार करत आहेत
त्यांना चिकटू नकोस
उलथून दुःखात पडशील
१६६)
देहदंड देणारे सोडले
तर जे माणसाला मारतात
ते स्वतःलाही मारतात
आणि मानवजातीलाही
जे माणसाला वाचवतात
ते स्वतःलाही वाचवतात
आणि मानवजातीलाही
१६७)
देहदंड देणाऱ्या कायदानिष्ठ माणसांनो
देहदंड देण्याआधी
दहा वेळा साकल्याने विचार करा
जर देहदंड देऊन एका अपराध्याला
काही माणसांचे प्राण वाचतील
तर आणि तरच
देहदंड द्या
जर तो अपराधी माणसाचे प्राण घेणार नाही
ह्याची खात्री त्याच्या वर्तनावरून वाटत असेल
तर त्याला जन्मठेप द्या
केवळ कायद्याने सत्ता हाती दिलीये
म्हणून कुणाचाही प्राण
अविवेकाने घेऊ नका
१६८)
जगात केऑस आहे आणि ऑर्डरही
केऑसने गोंधळू नको
आणि ऑर्डर आवळू नको
स्वतःसाठी सुव्यवस्था निर्माण कर
मात्र अवधान असू दे
कि केऑस कधीही
ही सुव्यवस्था भंग करू शकतो
सर्वच शक्यता माणसाला दिसत नाही
ज्या दिसतात त्या ही सर्व त्याला
नियंत्रणात आणता येत नाहीत
आणि ज्या नियंत्रित होतात
त्याही कायमस्वरूपी नियंत्रित नसतात
अशावेळी घाबरू वा गोंधळू नको
माणसाचे वैभव फक्त
सुव्यवस्थेत नाही
तर तो अव्यवस्था कशी हाताळतो
त्या हाताळणीतही आहे
१६९)
जे नियतीवर वा नियतत्वावर
विश्वास ठेवतात
ते नियतीचा बैल होऊन
नियतीत बुडतात
हे जग शक्यतांचे आहे
आणि त्यात कार्यकारणभाव
हा केवळ संभाव्यता आहे
ईश्वर ही निश्चतीकरणाची
माणसाला लागलेली
घाण हमीसवय आहे
तिच्यात अडकशील
तर निराशेत अडकशील
कशाचीही हमी देऊ नको
कशाचीही हमी घेऊ नको
मात्र जे आहे
जिथे आहे जसे आहे
साजरे कर
१७०)
बोलताना
जो समोर आहे वा जे समोर आहेत
त्यांच्याशीच बोल
जे तुझ्यापुढे उपस्थित नाहीत
त्यांच्या अनुपस्थितीत
त्यांच्या विषयी चांगले किंवा वाईट
काहीही बोलू नको
तरीही बोलावे लागले
तर चांगलेच बोल
आणि त्यांच्या अनुपस्थितीत
त्यांच्याविषयी चांगले बोलता येत
नसेल तर, निंदा करू नको
मौन पाळ
जे उपस्थित आहेत
त्यांच्याशी चांगले बोल
टीका /निंदा सहन करण्याची क्षमता
सर्वाकडे नसते
तेव्हा निंदा वा टीका नको
कुठे चुकतय ते समजावून सांग
यदाकदाचित टीका करणे भाग असेल
तर ती चांगल्या भाषेत कर
व सौम्यपणाने कर
टीकेने मनुष्य स्वतःचे दोष वा चूक
सुधारत नसेल
तर मनुष्य बदल
त्याच्याऐवजी पर्यायी मनुष्य निवड
पर्याय उपलब्ध नसेल तर
अधिक पैसे देऊन काम पूर्ण कर
गोड बोलून काम पूर्ण कर
तरीही काम अपूर्ण ठेवले जात असेल
तर पर्यायी काम निवड पर्याय निवड
आणि पर्यायी काम शक्य नसेल तर
काम ताटकळत ठेव
समोरचा माणूस सुधारे तोवर
तरीही काम पूर्ण केले जात नसेल
तर काम बंद कर
१७१)
वाईटाच्या नादी लागू नको
कोणी वाईट असेल तर त्याला भजू नको
वाईटालाही
त्याच्या योग्य वाटाइतपत पोहचव
त्याचा हक्क मारू नको
सूड घेऊ नको
तो धगधगत असेल
तर क्षमा कर
जो क्षमा करतो
तो सूडातून मुक्त होतो
१७२)
भांडण असेल
तर वाटाघाटी कर
समेट कर
तोडगा काढ
कुठलेच भांडण चिरंतन नसते
तोडग्याची वा समेटाची वाट बघ
१७३)
इतरांच्या दोषांना क्षमा कर
स्वतःतील दोष काढून टाक
स्वभावजन्य जनुकीय दोष असतील
तर त्यांचे अवधान राख
ते उसळून
काही गिळणार नाहीत ना
ह्याची काळजी घे
मनुष्य स्वतःच्या दोषांपासून
स्वतःचा पुतळा बनवतो
पण त्याचे सद्गुण
त्याचे पुतळेपण नाहीसे करून
त्याला जिवंत बनवतात
१७४)
तू मनुष्य आहेस
आणि मनुष्य नेहमीच फायद्यात असतो
तू मनुष्य नसतास
तर तुझे हे अणुरेणू
कुठेतरी धूळ खात पडले नसते काय
पण त्यांच्यात जीव आला
आणि ते फायद्यात आले
जर मनुष्य बनून
तुझे अणुरेणू फायद्यात आले असतील
तर तूही फायद्यात आला नाहीस का
दगडाला दुःख होत नाही जखम होत नाही
कारण तो मनुष्य नाही
तू मनुष्य आहेस
मग दरिद्री अस वा रोगी अस
दुःखी अस वा जखमी अस
फायद्यातच आहेस
आपण जिवंत आहोत
हा ह्या जगातील सर्वात मोठा
फायदा नाही काय
जिवंत असणे हेच तुझे खरे भांडवल
आणि तुझे श्वास
दिनरात्र फायदा आहे
१७५)
खोटे बोलणाऱ्याचे ऐकू नको
गॉसिप करणाऱ्याचे ऐकू नको
चकाट्या पिटणाऱ्याचे ऐकू नको
टवाळी करणाऱ्याचे ऐकू नको
दांभिक बोलणाऱ्याचे ऐकू नको
चहाड्या करणाऱ्याचे ऐकू नको
ह्या गोष्टी अंतिमतः
मेंदूला मंदत्व देतात
आणि जगण्याची गति मंद करतात
१७६)
ईश्वर नाही
आणि सैतानही नाही
तुमच्या तृष्णा आहेत
भुका आहेत निकडी आहेत
वासना आहेत कामना आहेत
त्याच सुख देतात
त्याच दुःख देतात
त्यांच्यापासून कितीही पळालास तरी
त्या तुझ्या आत असल्याने
तुझा पाठलाग करतील
जोवर जगण्याची वासना आहे
तोवर मरण्याचे भय आहे
तुला ह्या दोन्हीतून
वाटचाल करायचीये
त्यांचा द्वेष नको करू
फक्त त्या जश्या आहेत
तश्या स्वीकार
त्यांना सैतान समजून
त्यांचा द्वेष करशील
तर काहीही सुख न कमावता
आत्मद्वेष कमावशील
पापाच्या खोट्या चिखलात
अकारण लोळशील
तेव्हा त्यांचा दुस्वास नको करू
उलट त्या आहेत तश्या स्वीकार
१७७)
पैसे देताना
समोरच्याची पैस घेतले म्हणून सही घे
शक्यतो व्याज लावू नको
विशेषतः मित्र वा नातेवाईक असेल तर
अनोळखी असेल तर
कमीत कमी व्याज लाव
दिलेले पैसे वसूल कर
पण वसुली अयोग्य मार्गाने
वसूल करू नकोस
समोरच्याची पैसे परत करण्याची
क्षमता नसेल
तर त्याला काही साईड काम दे
आणि त्यातून पैसे वसूल कर
मात्र जे पैसे दान म्हणून देशील
ते पैसे मागू नको
दानाचा हिशेब ठेव
आणि ज्यांना दान देशिल
त्यांच्याकडून पावती घे
पारदर्शकता
पैश्याच्या व्यवहाराचा
प्राण आहे
ती कागदावर कायदेशीर बनव
१७८)
पैसे वाढतील
तसे दान वाढवत जा
मात्र दान
पैश्यात शक्यतो नको
ज्याला अन्न गरजेचे असेल
त्याला अन्न दे
नागड्याला वस्त्र
बेघराला घर
वा भाडयाचे घर
रुग्णाचे हॉस्पिटलचे बिल
निरक्षर व अशिक्षिताला शिक्षण
व शिक्षणाचा सारा खर्च
सक्षम बेकाराला नोकरी दे
वा व्यवसाय करू पाहणाऱ्याला
कमीत कमी व्याजाने भांडवल
आळश्याला श्रम करायला लाव
अकुशलला कौशल्य शिकव
१७७)
तुझ्या आईवडिलांनी, पूर्वजांनी
तू जन्माला येण्याआधीच
तुझा मेंदू तुझी अक्कल
ईश्वराकडे गहाण टाकली
आजही तिला सोडण्याऐवजी
तू ईश्वराची वेठबिगारी करतो आहेस
तू प्राचीन दासापेक्षा
मूर्ख नाहीस काय ?
प्राचीन गुलामांचा मालक
निदान अस्तित्वात होता
त्याला शरीर होते
तुझा मालक तर अस्तित्वातही नाहीये
आणि तरी तू त्याच्याकडे गहाण आहेस
स्वतंत्र हो
आणि ह्या वेठबिगारीपासून
मुक्ति मिळव
१८०)
एकाच चवीचे अन्न
कंटाळा आणते
स्त्रीपुरुष संबंधातील एकच शरीर
कंटाळा आणते
एका घरातील रहिवासीपण
कंटाळा आणते
एकाच विषयाचे शिक्षण
कंटाळा आणते
एकाच प्रकारचा व्यायाम
कंटाळा आणतो
मन तोचतोचपणाला कंटाळते
आणि विविधतेला घारबते
तोचतोचपनात शाश्वती असते सवय असते
विविधतेत दुसरी शक्यता
कुठलीही शक्यता लवकरच संपण्याची शक्यता असते
तेव्हा विविधतेसाठी
काय पणाला लावतोयस
ह्याचा विचार कर
जग न संपणाऱ्या शक्यतांचे
जाळे आहे
आणि साऱ्या शक्यता चाखण्याची शक्यता
तुझ्या मर्यादित आयुष्यात
दूरुनवयानेही नाही
तेव्हा विविधतेतही कुठेतरी थांबावेच
लागणार आहे
त्या थांब्याचा नीट विचार कर
क्षणभंगुर विविधता
आणि अमर तोचतोचपणा
ह्यातील निवडीचा पेच
ज्याला त्यालाच सोडवावा लागतो
आणि तो सोडवताना
कंटाळा विविधतेकडे ढकलत असतो
तेव्हा स्वतःचा पिंड नीट ओळख
आणि मगच आयुष्य पणाला लाव
१८१)
जर इतरांपेक्षा तुला
निसर्गाने जास्त काही दिले आहे
तर त्याचा अभिमान बाळगू नकोस
कारण ते कमावण्यासाठी
तू काहीच केलेले नाहीस
जर निसर्गाने तुला इतरांपेक्षा
काही कमी दिले असेल
तर त्याचाही न्यूनगंड बाळगू नकोस
कारण ते नसण्यासाठी
तू जबाबदार नाहीस
१८२)
काटकसरी हो
पण कंजूस होऊ नको
मदत कर
पण उधळपट्टी करू नको
आवश्यक असेल
तिथे तुझ्या मदतीचा हात पोहचव
जो बुडत असेल त्याला वाचव
१८३)
जे फक्त संग्रह करतात
आणि वाटत नाहीत
जे फक्त साठा करतात
पण लोकांत वितरण करत नाहीत
ते माणुसकीचे गुन्हेगार आहेत
१८४)
परलोकातल्या काल्पनिक सोन्यापेक्षा
इहलोकातील खरे पितळ
हे जास्त मूल्यवान आहे
परलोकाची स्वप्ने पहाण्यापेक्षा
इहलोकातील तुझी स्वप्ने साकार कर
मात्र ती साकारताना
इतरांची स्वप्ने साकारायला मदत कर
किमान त्यांना दुखावू नकोस
१८५)
तू ज्यांना मदत केलीस
ते सारेच परतफेड करणार नाहीत
उपकाराबदली सर्वच उपकार करतील
असे नाही
पण तरीही मदत कर उपकार कर
कारण जेव्हा तुला मदत लागेल
तेव्हा त्यांच्यावर तू उपकार केलेस
वा ज्यांना तू मदत केलीस
त्यापैकीच कोणी तुला मदत करेल
करोडो स्पर्म (sperm) सोडशील
तर त्यातील एक ते पाच सहा फळतील
उरलेले सर्व गायब होतील
तेव्हा मदत अनेकदा कर अनेकांना कर
आणि एखादी फळली तरी
ती फळवणाऱ्याचे आभार मान
१८६)
कुणाचाही वारसा हक्क बुडवू नको
कुणाचाही योग्य वाटा
देताना चुकू नको
ज्यांना जन्मजात
वारसा हक्क मिळालेला नाही
त्यांना तो सरकारमार्फत मिळवून दे
वा स्वतः त्यांना मदत कर
ज्यांचे आईबाप निर्धन आहेत
त्यांना
त्यांच्या आईबापांच्या निर्धनतेची
शिक्षा मिळणार नाही
ह्याची काळजी घे
संधी सर्वांनाच मिळायला हवी
आणि ती सर्वांना समानतेने
मिळायला हवी
ज्यांना संधी नाकारली गेलीये
त्यांच्यासाठी संधी तयार कर
आणि जे संधी देऊनही
स्वतःच्या आळसापोटी
व्यसनाधीनतेपोटी
अनाचारापोटी
वाईट सवयींपोटी
तिला वाया घालवतात
त्यांचा सार्वजनिक निषेध कर
आणि त्यांना सुधारगृहात पाठवून दे
१८७)
सर्वांना सारख्याच जागी पोहचता येत नाही
सर्वांना समान उंची गाठता येत नाही
सर्वांनाच सर्वत्र विस्तारता येत नाही
मात्र ज्याला ज्या जागी पोहचायचे आहे
त्याला त्या जागी पोहचण्याची संधी हवी
ज्याला जी उंची गाठायची आहे
त्याला ती गाठायची संधी हवी
ज्याला स्वतःचा जो विस्तार करायचा आहे
त्याला तो विस्तार करण्याची संधी हवी
जे अल्पसंतुष्ट आहेत
त्यांना अल्पसंतुष्ट राहण्याचे स्वातंत्र्य हवे
ज्यांना स्पर्धेच्या बाहेर रहायचे असेल
त्यांना स्पर्धेच्या बाहेर राहण्याची मोकळीक हवी
समान आकाराचे ठोकळे
कुरूप दिसतात
विविध आकारांची मांदियाळी
श्रीमंत दिसते
१८८)
माणसे संतंतीसाठी काहीही करू शकतात
म्हणूनच संतंतीला जन्म दे
मात्र तिच्या प्रेमात इतका आंधळा होऊ नको
कि इतरांच्या संतंतीचे त्याने नुकसान होईल
स्वतःच्या संतंतीचे भले कर
पण इतरांच्या संतंतीचे वाईट न करता
१८९)
शेजाऱ्यावर प्रेम कर
पण शेजारी चुकीचे वागत असेल
तर गोड शब्दात त्याची चूकही दाखव
तो गुन्हेगार असेल
तर पोलिसांना तसा रिपोर्ट दे
आणि चांगला असेल
तर त्याला नातेवाईकाचा दर्जा दे
शक्य असेल तेवढी मदत कर
१९०)
म्हातारपण कुणाला चुकले ?
तुलाही ते अटळपणे येणार आहे
सर्वच म्हातारपण शहाणे नसते
आणि सर्वच म्हातारपण अनुभवी नसते
मात्र ज्या म्हातारपणाजवळ अनुभव आहे
शहाणपण आहे
त्याच्याकडून जरूर शिक
जे खडूस वा विक्षप्त असेल
त्यांना क्षमा कर
व सांभाळ
म्हातारपण असहाय्य व दुर्बल असते
त्यांना सहाय्य दे बल दे
तुला हे माहीत आहे का
उष्ण पदार्थ त्याच्यापेक्षा कमी उष्ण पदार्थाला
स्वतःची उष्णता देऊ शकतो
पण कमी उष्णता असणारा पदार्थ
त्याची उष्णता जास्त उष्णता असलेल्या
पदार्थाला देऊ शकत नाही
सूर्य पृथ्वीला उष्णता देऊ शकतो
पण पृथ्वी सूर्याला उष्णता देऊ शकत नाही
एक दिवस असा येईल
तुझी उष्णता तुझ्या मुलांपेक्षा कमी होईल
तेव्हा मुले उष्णता घेत नाहीत
म्हणून शोक करू नकोस
मात्र ते उष्णता देत असतील
तर ती आनंदाने घे
आणि तुझ्या कमी उष्णतेची ऊब
त्यांना दे
तुझी कमी उष्णतेची नातवंडे जन्मतील
तुझी उष्णता त्यांची गरज असेल
त्यांना ती उष्णता दे
हा उष्णतेचा प्रवाह
पिढी दर पिढी
चालता ठेव
***